प्रेम आणि विवाह

प्रेम, किती गोंडस, लहान पण वजनदार, व्याकरणात्मक सोपा पण अर्थाने अवघड, सगळंच काही एका शब्दात. एका अडीच अक्षरी शब्दात.

आजवर इतक्या कहाण्या आपण ऐकल्या, इतकी पुस्तकं, कादंबऱ्या आणि सिनेमे तर काही विचारूच नका. प्रेमाची महती आपापल्या परीने प्रत्येकाने सांगितली. पण खऱ्या आयुष्यात प्रेम आणि विवाह, याचे फार चांगले अनुभव कुणाच्या गाठी नाहीत. मुळात हा विवाह फसतो कुठे!

पूर्वी इतकी लग्न व्हायची आणि अगदी बोटावर मोजण्याइतकी मोडायची. आता परिस्थिती उलट होऊ लागलीये. या सगळ्या मागे मुख्य कारण म्हणजे नात्यातली नाविन्यता. सगळ्यांना माहीत आहे, की एकच एक काम करून आपल्याला त्याची सवय होते, पण कालांतराने कंटाळाही येतो. जसं प्रत्येक दैनंदिन जीवनात आपण नाविन्यता शोधत असतो, तशी वैवाहिक आयुष्यात पण शोधतोच. प्रेम विवाहामध्ये जोडीदाराची ओळख आधीच इतकी असते, की नाविण्यातेपेक्षा रूटीनच जास्त होत. अर्थात दोघांना एकमेकांची खूप सवय असते, पण नात्याचं नाव बदलत, जबाबदारी वाढते, स्वातंत्र्य कमी होत. या सगळ्यांचा शेवट छोटे वाद आणि मोठ्या भांडणांत होत. अर्थात प्रत्येक गोष्टींना अपवाद असतो. अशा सगळ्या परिस्थतीतही खूप सेंसिबल निर्णय घेऊन कपल्स खूप प्रेमाने नांदतात, पण ती काही मोजकीच.

पारंपारिक लग्न (अर्थात आपलं अरेंज मॅरेज) याबाबतीत फार वेगळं आहे. कारण जोडीदाराचा प्रत्येक पैलू नव्याने पाहत असतो, अनुभवत असतो. आपली आवड निवड, आपलं मत मांडत असतो, शक्य तितकं जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गोष्टी नवीन नात्याची जबाबदारी सांभाळत करत असतो. एखादी गोष्ट नाही आवडली तरी आपण जोडीदाराच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याशी उगाच वाद घालण्यापेक्षा त्याच मन जाणण्याचा प्रयत्न करत असतो. कधी डोळ्यांत पाहून, तर कधी नुसत्या खुणेनेच. गंमत म्हणजे हे सगळं होत असताना बराचसा वेळ निघून जातो, काळाची चाक पुढे जात आणि कधी पती पत्नी नात्याचं मैत्रीत रूपांतर होत, त्यांचं त्यांनाही कळत नाही.

फार सूक्ष्म विचार करून आपल्या पूर्वजांनी काही रिती रूढ केल्या आहेत. काळजीपूर्वक विचार केला तर त्यातील बऱ्याच रितींमध्ये तथ्य सापडेल. अजूनही वेळ आहे, आजुबाजूच जग काहीतरी करतंय म्हणून आंधळेपणाने फॉलो करण्यापेक्षा एकदा स्वतः विचार करा.

Spread the love