भूमिका पालकांची…

नमस्कार! लग्न आणि लग्नाच्या आजूबाजूचे सारे महत्वाचे घटक याबाबत आपण सांगतच आहोत, पण यात सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे पालकांची भूमिका. अर्थात, हे जर ३०-४० वर्षांपूर्वीच लग्न असतं, तर एकत्र कुटुंब पद्धतीमुळे हा निर्णय फार सोपा असायचा. ‘ मोठ्या ‘ माणसांच्या निर्णयाला तितकं मान असायचा, खात्रीशीर स्त्रोतांकडून चौकशी, माणूस अचूक हेरण्याची कला, व्यावहारिकता यामुळे लग्नाचे निर्णय चटपट व्हायचे. लग्नही व्हायची. आणि अर्थात ती टिकायचीपण! फार क्वचित एखादं लग्न मोडायच.

आता परत वर्तमानात. वर लग्न झालेली हीच पिढी आता पालक आहेत आणि त्यांच्यावरही आज तोच प्रसंग आहे. आपल्या मुलांना उत्तम आणि अनुरूप जोडीदार मिळवून देण्याची. इथे फक्त एक वेगळं आहे. लग्न करणारी पिढी आता पूर्वीसारखी नाहीये. त्यांना फक्त स्वतःचे विचार नाहीत, तर ते मांडण्याची धमक पण आहे. थोडीची अवखळ, निडर, आत्मविश्वासाने भरलेली अशी. अशा या पिढीला उत्तम दिशा दाखवली, तेही त्यांच्या कलाने तर ती कुठच्या कुठं निघून जातात. करीयर असो किंवा लग्न, सर्वच ठिकाणी प्रगती करतात, आनंदाने जगतात. अशावेळी मनाला न पटलेला एखादा निर्णय पूर्ण आयुष्याला वळण देण्यास कारणीभूत ठरल्याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. प्रत्येक पालकाला याची काळजी आहेच, यात शंका नाही.

विशेषकरून लग्नाच्या बाबतीत लग्न करण्याची इच्छा, इथपासून सुरुवात असते. अशावेळी योग्य वयात, जितकं पाल्याच्या नकळत याविषयी बोलण्याची सुरुवात केली, तर त्यांची लग्नाची तयारी उत्तम होते. जितका लग्नाचा ससेमिरा जास्त, तितकी ही पिढी दूर पळते. लग्नामुळे आपलं स्वातंत्र्य दुरावत की काय, ही एक भावना त्यांच्या मनात असते.

एक पालक म्हणून त्यांना तुम्ही तुम्हाला न मिळालेली प्रत्येक गोष्ट देण्याचा प्रयत्न केला आणि आपापल्या परीने दिलीसुद्धा. कदाचित आपल्या काळात आपल्या मतांना, निर्णयाला इतकं स्वातंत्र्य नसेल, म्हणून तेही आपण त्यांना दिलं. तरीही आज कालच्या बहुतांश पालकांचं हेच मत असतं ( अगदी उघडपणे, तुझ्या आवडीच्या जोडीदाराशी लग्न कर, अस म्हटलं तरी मनाचा एक कोपरा सांगत असतो, की आमचं पण मत घ्यावं ) की सगळे निर्णय तुझ्या आवडीने जरी घेतलेस, तरी लग्न आमच्या मताने होणार. आता याचे बरेच पैलू आहेत. काही पालकांना वाटत असतं की आपला मुलगा किंवा मुलगी इतकी सक्षम नाही. काहींना वाटतं की आपल्या घराण्याला शोभेल असं स्थळ मिळेल किंवा आवडेल का? बऱ्याचदा मुला- मुलींच्या अपेक्षा माफक असतात. पण आई वडिलांच्या इच्छेमुळे एखादं खूप आवडलेल स्थळाला नाही सांगावं लागत. तुझ्यात काय कमी आहे, मिळेल याहून चांगलं स्थळ, अस म्हटलं की पालकांचं निभावत. पण खरंच त्या मुलांच्या जागेवर जाऊन आपण विचार करू शकतो का, हे फार महत्त्वाचे आहे.आजची पिढी तुमचं नक्कीच ऐकेल, पण त्यांना आयुष्यातला हा महत्वाचा निर्णय घेण्यासाठी मदत करा, लादू नका. कारण आज तुमचं ऐकून ते कदाचित लग्न करतीलही पण आयुष्य जाईल त्यांना लग्न आणि त्यातला आनंद शोधण्यात. आम्हाला नक्की खात्री आहे, एका जबाबदार पालकपेक्षा एक व्यक्ती म्हणून याकडे तुम्ही त्रयस्थपणे पहाल. मग बघा, तुम्हाला पटतं का नाही. आणि आम्ही आहोतच तुमच्या सोबत.

Spread the love